गुरु परमात्मा परेशु
गुरू म्हणजे ज्ञान, गुरू म्हणजे निरंतर वाहणारी नदी, गुरू म्हणजे सतचितआनंद, गुरू म्हणजे कुबेराचे धन, गुरू म्हणजे प्रसाद.
हा दैवी प्रसाद ज्याला मिळाला त्याचे जीवन धन्य झाले.
यंदा कोरोनामुळे जी परिस्थिती उदभवली आहे, त्यामुळे सगळेच सण, उत्सव , डिजिटली साजरे होत आहेत. ज्या वारी कडे असंख्य लोकांची नजर असते ती सुध्दा मनवारी ठरली.अति तेथे माती हे उगीच नाही म्हटल्या जात.आपल्याला सतत सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत गेल्या तर त्याच महत्व उरत नाही.
म्हणूनच भगवंतांनी हे संकट निर्माण करून प्रत्येकाला ज्याचे त्याचे स्थान दाखवून दिले.
गुरूला अध्यात्म शास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे, आपल्या संस्कृतीत अनेक गुरू शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत,जसे रामकृष्ण- विवेकानंद, मच्छिन्नद्रनाथ-गोरक्षनाथ, कृष्ण-अर्जुन, ह्या सगळ्यांनी प्रसंगी आपल्या शिष्याची कान उघडणी केली आणि त्याला योग्य मार्ग दाखविला. खरच प्रत्येकाला असा गुरू मिळावा जो आपल्याला कठीण प्रसंगात मार्गदर्शन करेल.
माझे पहिले गुरू माझे आई-वडील. त्यांच्यामुळेच मलाही लहान वयातच सद्गुरूंचा सहवास लाभला .
स्वामी *श्री. विद्यानंद* पूर्वाश्रमीचे "दामोदर केशव पांडे" हे माझे सद्गुरू.
त्यांनी अत्यन्त बिकट परिस्थितीतून मार्ग काढत आपले अध्यात्मिक जीवन घडविले. त्यांचा संपूर्ण जीवनपटच प्रेरणा देणारा आहे.
घरात अनेक माणसे त्यामुळे मानसिक कुचम्बणा होतच होती. तीन भाऊ आणि तीन बहिणी इतका मोठा आप्तपरीवर . पण तात्यांच्या हुशारीने आणि करारी बाण्याने या ओढगस्तीच्या परिस्थितीवर मात केली.
1942 च्या संग्रामात देशासाठी जणू रणकंदनच माजले होते. साहजिकच तात्याही त्यात ओढले गेले. जाज्वल्य देशभक्ती हा त्यांचा स्थायीभावच होता.या देशभक्तीतूनच स्वामीजी देवभक्ती कडे वळले.
स्वामी विद्यानंद हे पावसाच्या स्वरूपानंदांचे अंतरंग शिष्य , तसेच त्यांनी नाथ संप्रदाय,ज्ञानेश्वरी चिंतन आणि अरविंद तत्वज्ञानाची सांगड घालून एक वेगळाच मार्ग तयार केला.स्वामीजींचा हा साधना मार्ग सर्व सामान्य प्रापंचिकाना अध्यात्म अतिशय सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगणारा आहे.त्यात कर्मकांड,सांप्रदायिक अभिनिवेश याला स्थान नाही.जे आहे ते विशुद्ध ज्ञान.
स्वामीजींचे शंभराहून अधिक ग्रंथ आज प्रसिद्ध आहेत.प्रत्येक ग्रंथ निर्मिती एक ईश्वरी प्रयोजनच. भावार्थ रामायण, भावार्थ भागवत, उपनिषद,नारदीय सुक्त, अमृतानुभव, साधकबोध, ज्ञानेश्वरी नित्यपाठ असे एक ना अनेक. या कारणानेच त्यांना 'केवलं ज्ञान मूर्ती " ही उक्ती प्राप्त झाली. अश्या ज्ञानसाधूला माझे शतशः प्रणाम
🏼
🏼
*अखंड-मंडलाकारं व्याप्तम येन चराचरम*
*तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा