मुलखावेगळी माणस
राणी माझी खूप जवळची मैत्रीण.खरतर ती तशी खूप उशीरा माझ्या आयुष्यात आली.आशुतोष आणि श्रद्धानंद हे जिवलग मित्र.लग्नेही मागेपुढेच झाली.आमच्या साक्षगंधात नवऱ्याच्या मित्राची बायको म्हणून राणी पहिल्यादा भेटली आणि ती माझीही जिवलग कधी झाली ते कळलच नाही.अगदी सख्या बहिणीसारखे आमचे सूर जुळले.आमचा नवा संसार,मुलांचं लहानपण या सगळ्यांवर तिच्या घट्ट आणि स्निग्ध स्नेहाची साथ कायम सोबत होती आणि आहे.लहान मोठा कुठलाही प्रॉब्लेम तिच्याशी शेअर केला नाही असं कधी घडलं नाही.मुलांना तर तिचा खूपच लळा. राणी म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा.मी तिला आजवर कधीही डिप्रेस,उदास बघितलेलं नाही.ती एक उत्तम डॉक्टर आहे सोबतच आदर्श गृहिणीही.तर श्रद्धानंद अगदी लहान वयात खूप मोठे नाव,प्रतिष्ठा कमावलेले प्रसिद्ध वकील.सुखी आणि समृद्ध संसार. आयुष्याच्या या स्थिर टप्यावर आपण सारेच खूप आत्मकेंद्रीत होत जातो.वैयक्तिक जीवनातलं राहून गेलेलं सगळं मिळवण्यासाठी हपापल्यासारखे धावतो.आपली मुलं आणि त्यांचं करिअर हेच आपल्या जगण्याचं केंद्र,आपलं सर्वस्व असत. नेमक्या या टप्यावर राणी मात्र इतरांच्या मुलांसाठी जगते आहे.तेही अबोलपणे,कुठलाही गाजा वा...