मुलखावेगळी माणस

राणी माझी खूप जवळची मैत्रीण.खरतर ती तशी खूप उशीरा माझ्या आयुष्यात आली.आशुतोष आणि श्रद्धानंद हे जिवलग मित्र.लग्नेही मागेपुढेच झाली.आमच्या साक्षगंधात नवऱ्याच्या मित्राची बायको म्हणून राणी पहिल्यादा भेटली आणि ती माझीही जिवलग कधी झाली ते कळलच नाही.अगदी सख्या बहिणीसारखे आमचे सूर जुळले.आमचा नवा संसार,मुलांचं लहानपण या सगळ्यांवर तिच्या घट्ट आणि स्निग्ध स्नेहाची साथ कायम सोबत होती आणि आहे.लहान मोठा कुठलाही प्रॉब्लेम तिच्याशी शेअर केला नाही असं कधी घडलं नाही.मुलांना तर तिचा खूपच लळा.
राणी म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा.मी तिला आजवर कधीही डिप्रेस,उदास बघितलेलं नाही.ती एक उत्तम डॉक्टर आहे सोबतच आदर्श गृहिणीही.तर श्रद्धानंद अगदी लहान वयात खूप मोठे नाव,प्रतिष्ठा कमावलेले प्रसिद्ध वकील.सुखी आणि समृद्ध संसार.
आयुष्याच्या या स्थिर टप्यावर आपण सारेच खूप आत्मकेंद्रीत होत जातो.वैयक्तिक जीवनातलं राहून गेलेलं सगळं मिळवण्यासाठी हपापल्यासारखे धावतो.आपली मुलं आणि त्यांचं करिअर हेच आपल्या जगण्याचं केंद्र,आपलं सर्वस्व असत.
नेमक्या या टप्यावर राणी मात्र इतरांच्या मुलांसाठी जगते आहे.तेही अबोलपणे,कुठलाही गाजा वाजा न करता.गेल्या दोन तीन वर्षांपासून ती आपल्या मुलांसह,घराजवळच्या २५-३० मुलांसाठी विविध उपक्रम राबवते आहे.अगदी स्तोत्र शिकवण्यापासून तर कला शिबीर घेण्यापर्यंत,वाचनाची गोडी लावण्यापासून तर उत्तम सिनेमे दाखवण्यापर्यंत,गायत्री परिवाराच्या यज्ञात सहभागी करण्यापासून तर जंगल सफारीपर्यंत,योगासने शिकवण्यापासून तर या सगळ्या मुलांना आकाशवाणी,युसीएनवर एक्सपोजर देण्यापर्यंत.! बरं हे सगळं स्वखर्चाने या कानाचे त्या कानाला कळू न देता ! त्यासाठी श्रद्धानंद यांनी त्यांच्या आईबाबांच्या स्मृत्यर्थ लक्ष्मीविष्णू फाऊंडेशन चा आधार तिच्यासाठी उभा केला आहे.सुट्यांमध्ये रोज तर शाळेच्या दिवसात विकेंडला या सगळ्या मुलांचा तिच्या घरी गराडा असतो.
परवा ती या सगळ्या ३० मुलांना तानाजी सिनेमा बघायला घेऊन गेली. त्यानंतर एखाद दिवस आराम करावा ना ! पण सिनेमा बघून प्रेरित झालेल्या मुलांचे उजळलेले चेहरे बघून लगेच तिला एक कल्पना सुचली.ती म्हणजे या सगळ्या मुलांना ते तानाजीच्या प्रभावात असतानाच शिवचरित्र ऐकवण्याची.दुसऱ्याच दिवशी तिने पुन्हा सगळ्या मुलांना एकत्र केलं.त्यांच्याशी शिवचरित्रावर बोलायला,गप्पा मारायला आशुतोषला बोलावलं.राणीभाभीने बोलावल्यावर आशुतोष जाणार नाही असं कसं होणार ?
मुलं शिवचरित्रातील घटना खूप तल्लीनतेने ऐकत होती,त्याला अनेक प्रश्न विचारत होती..त्या चरित्रातील वीरतेशी आपसूकच स्वतःला रिलेट करीत होती.मुलांची काही चांगलं ऐकण्याची ती भूक बघून खूप भरून आलं.किती निरागस आणि छान असतात लहान मुलं.मऊ, मुलायम मातीचे गोळेच जणू.राणी तू किती मोठं काम विलक्षण सहजतेने करते आहेस ते त्या दिवशी कळलं..उमजलं..हे सगळं लिहिलेलं तुला आवडणार नाही कदाचित.पण राहवलं नाही.
हॅट्स ऑफ टू यु रानी अँड श्रद्धानंद सर यु टू ! 


खूप सुरेख लिहिलं आहे, राणी ' भेटली'.
उत्तर द्याहटवाराणी मनात ठसली.खूप छान
उत्तर द्याहटवा